जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण
मुंबई (प्रतिनिधी ) :- जोगेश्वरी पूर्व येथील अंबिका नगर परिसरात रामनवमी उत्सव 2026 यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी भगवान रामाच्या प्रतिमेची पूजा-अर्चा करत उत्सवाची सुरुवात केली. उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष आकर्षण ठरले ते श्री ढोल-ताशा पथकाचे दमदार वादन. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आणि उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिस्तबद्ध नियोजन, नागरिकांचा सहभाग आणि उत्साही वातावरण यामुळे यंदाची रामनवमी अधिकच रंगतदार ठरली.

