देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!
मुंबई ( गोरेगाव प्रतिनिधी ) :- विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह म्हणजे मराठी रंगभूमीचा एक देदिप्यमान इतिहास. या मंचावर आजवर असा एकही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री नसेल, ज्याने आपली कला सादर केली नाही. पण याच ऐतिहासिक मंचावर जेव्हा 'देवके' गावची माणसं एकत्र येतात आणि 'हाउसफुल'चा बोर्ड लावतात, तेव्हा तो क्षण सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा असतो. दीनानाथ नाट्यगृहाच्या कणाकणात एक वेगळीच ऊर्जा आहे. इथे वाजणारी नाटकाची तिसरी घंटा आणि त्यानंतर चोखंदळ रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद, ही कोणत्याही कलाकारासाठी जगातल्या सर्वोच्च पुरस्कारापेक्षा मोठी असते. या वास्तूत नाटक गाजवणं हे सोपं नसतं.काहीतरी घडतंय इथं' हे नाटक केवळ रंगमंचावरील कलाकारांचे नव्हते, तर ते पडद्यामागे अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्रत्येक हाताचे यश आहे. रंगमंचावर वावरणारे देवके गावचे कलाकार असोत किंवा नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत सांभाळणारे पडद्यामागील पडदेकरी; प्रत्येकाने आपल्या रक्ताचे पाणी करून हा प्रयोग उभा केला.तालीम ते प्रत्यक्ष सादरीकरण या प्रवासात सर्वांची मेहनत दिसून आली. म्हणूनच या प्रयोगाने दीनानाथचा 'हाऊसफुल'चा गड सर केला. हे यश केवळ कलाकारांचे नाही, तर त्यामागे उभ्या असलेल्या देवके ग्रामस्थ आणि मुंबईकरांची भक्कम साथ आहे. आपल्या गावच्या नाटकासाठी सर्व देवके ग्रामस्थ आणि मुंबईत राहणाऱ्या हितचिंतकांनी तिकीट विक्रीसाठी प्रचंड मेहनत केली. प्रत्येकाने हे नाटक आपले समजून घराघरात पोहोचवले.
आजच्या काळात मोठ्या सेलिब्रिटींनाही जे शक्य होत नाही, ते आपल्या गावच्या माणसांनी एकजुटीने करून दाखवलं. 'हाउसफुल'ची पाटी ही या सर्व सामान्य माणसांच्या असामान्य जिद्दीची पोचपावती आहे. मोठ्या कलाकारांची नाटके अनेकदा गर्दी खेचण्यास कमी पडतात, पण जिथे प्रामाणिक मेहनत आणि गावाची ओढ असते, तिथे प्रेक्षक स्वतःहून खेचले जातात. दीनानाथला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद सिद्ध करतो की, जर कलाकृती मनापासून सादर केली आणि त्याला समाजाची साथ लाभली, तर इतिहास घडवता येतो. विलेपार्लेच्या दीनानाथमध्ये 'काहीतरी घडतंय इथं' च्या प्रयोगाने हे दाखवून दिले की, जेव्हा पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार जिद्दीने पेटून उठतात, तेव्हा यश नक्कीच मिळते. प्रयोगाच्या शेवटी सर्व कलाकार व मेहनत घेणाऱ्या ग्रामस्थांचे आभार उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले.
