अंधेरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद......
मुंबई :- इनर व्हील क्लब ऑफ मुंबई अंधेरी यांनी कॅनोसा जीवन विकास केंद्राच्या सहकार्याने नुकतेच कॅनोसा कॅम्पस, अंधेरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. वंचित घटकांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या शिबिरात डॉक्टर व वैद्यकीय स्वयंसेवकांनी सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह सल्लामसलत केली. यामध्ये डोळे, दात व दमा यांसारख्या आजारांची विशेष तपासणीही करण्यात आली. एकूण १७८ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, त्यापैकी १२१ जणांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्वांना मोफत मल्टिविटामिन्स देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सोनाली तसेच सदस्य लतिका, जिग्नासा, शर्मिष्ठा, अर्चना आणि नीलिमा यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजकल्याण, आरोग्य जनजागृती आणि सेवाभाव यासाठी क्लबची बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली. या उपक्रमासाठी डॉ. जैन व त्यांची टीम (ब्रह्माकुमारीज ग्लोबल हॉस्पिटल), एल अँड टी हेल्थ सेंटर, हिरन पांचाल - हेल्थकेअर चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. साहिल चव्हाण - दंतदर्शन आणि वीणा दिवेदी - ऑरेक्सकेअर यांचे सहकार्य लाभले.
