शिधावाटप विभागाची धडक कारवाई; जोगेश्वरीत घरगुती गॅसचा साठा जप्त
मुंबई (प्रतिनिधी ) :- गुरुवार दि. २५ मार्च २०२६ रोजी उपनियंत्रक शिधावाटप ‘ड’ परिमंडळ, सांताक्रूझ (पूर्व) कार्यालयाच्या पथकाने जोगेश्वरी (पूर्व) परिसरात कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी (पूर्व) येथील लजीज शिक कबाब हॉटेलमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर साठवून त्याचा व्यावसायिक वापर केला जात होता. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान ४ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून एकूण ३२,६४८/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणात वाहिद अमीन अत्तार याला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई शिधावाटप अधिकारी हरिष पटेल यांनी केली. ही कारवाई सहायक नियंत्रक अश्विन रोहिणीकर यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपनियंत्रक भास्कर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गॅसचा साठा, काळाबाजार किंवा गैरवापर आढळल्यास अधिक माहितीसाठी उपनियंत्रक भास्कर तायडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

