उद्योजक दीपक जाधव यांची ‘मुंबई व्यापारी असोसिएशन’च्या शहर संघटकपदी नियुक्ती

 मुंबई (प्रतिनिधी) :- गोरेगावमधील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या ३२ वर्षांपासून सक्रिय असलेले ‘श्वेता स्टुडिओ’चे संचालक दीपक सूर्यकांत जाधव यांची ‘मुंबई व्यापारी असोसिएशन’च्या मुंबई शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, तसेच स्थानिक भूमिपुत्रांना स्वयंरोजगारात प्राधान्य मिळवून देणे, ही दुहेरी जबाबदारी आता जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे व्यापारी वर्तुळातून स्वागत करण्यात आले असून गोरेगावसह मुंबईतील विविध भागांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या नियुक्तीचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष अनिल फोंडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुंबईतील पत्रकार भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.दीपक जाधव यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पार्श्वभूमीही उल्लेखनीय आहे. ते ‘लोकसेवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष, ‘जाधव हितवर्धक मंडळ’चे सचिव, तसेच मुंबई काँग्रेस (आय) पीसीसीचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारेच असोसिएशनने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई व्यापारी असोसिएशनच्या ध्येय-धोरणांनुसार स्वयंरोजगार वाढवणे, स्थानिकांना व्यवसायात प्रोत्साहन देणे आणि व्यापाऱ्यांच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, या बाबींवर जाधव विशेष भर देणार असल्याचे सांगितले जाते. प्रारंभी ६ महिन्यांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून कार्याचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढ दिली जाणार आहे.संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करून व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास व्यक्त करत, विविध सामाजिक, राजकीय आणि व्यापारी संघटनांकडून दीपक जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


Popular posts from this blog

जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!

महिलांच्या सात थरांचा विश्वविक्रम; पार्ले स्पोर्ट्स क्लबला सन्मानपत्र