"मुंबईत ‘फेक पोलीस’चा धक्कादायक प्रकार"; महिलेला धमकावून पैसे उकळणारी टोळी गजाआड
"पोलीस नावाखाली फसवणूक; आरे पोलिसांची दमदार कारवाई, ५ आरोपी अटकेत"
गोरेगाव (प्रतिनिधी ) :- पोलीस असल्याची खोटी बतावणी करून एका गृहिणीला धमकावत दोन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आरे पोलिसांनी पर्दाफाश करत २ महिलांसह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेशी संपर्क साधून स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. ड्रग्स तसेच वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्यांनी महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले. त्यानंतर ऑनलाईन लिंक पाठवून पैशांचा व्यवहार करण्यास भाग पाडत तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले.
फसवणुकीची बाब लक्षात येताच पीडितेने आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.क्र. ४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३०८(६), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सचिन पांचाळ यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढत टोळीचा छडा लावला. सदर तपासादरम्यान आरोपींनी बनावट ओळख वापरून गुन्हा केल्याचे उघड झाले. आरे पोलिसांनी सापळा रचून २ महिलांसह ५ आरोपींना अटक केली असून या टोळीने आणखी काही महिलांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त महेश चिमटे, पोलीस उपायुक्त विजय भिसे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सचिन पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरे, महाले, बरकडे, गणेश पाटील आदींच्या पथकाने पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.@By team Mumbai Metro News