श्रीधर फडके यांच्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीनिमित्त “येथोनि आनंदु रे” कार्यक्रम कल्याणमध्ये यशस्वी
मुंबई ( प्रतिनिधी ) :- सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा पाच दशकांचा सुवर्ण महोत्सवी सांगीतिक प्रवास दर्शवणारा “येथोनि आनंदु रे” हा कार्यक्रम कल्याण येथील अत्रे रंगमंदिरमध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. सुस्वर क्रिएशन्स (संचालिका सुकन्या जोशी), अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान (संस्थापक योगेश जोशी) आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय रचना शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी साकुरीकर, सुराज सोमण यांनी सादर केल्या. तसेच श्रीधर फडके यांनी ओंकार स्वरूपा, जय शारदे, तुला पाहिले मी, तोच मी, फिटे अंधारचे जाळे ही गाणी सादर करून रसिकांना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव दिला.
श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हिंदू सामर्थ्य गीत आणि डॉ. दीपक वझे लिखित, शंकर महादेवन गायलेले गीत स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले, ज्याला रसिकांची विशेष दाद मिळाली. निवेदिका सुकन्या जोशी यांनी त्यांच्या निवेदनातून श्रीधर फडके यांचा सुवर्ण महोत्सवी प्रवास उलगडून दाखविला आणि विचारलेल्या प्रश्नांना श्रीधर फडके यांनी मनमोकळी उत्तरे दिली. कार्यक्रमासाठी मंदार सोमण संगीत मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तर तुषार आगरे, मनीष ठुमरे, व्यंकटेश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, विनय चेऊलाकर आणि संदीप मिस्त्री यांनी वादक म्हणून साथसंगत केली.
कार्यक्रमात श्रीधर फडके यांना शाल, श्रीफळ, मानाची थैली, सुवर्णांकित सरस्वती प्रतिमा, यंत्र आणि अनंत हलवाई यांच्या वतीने आम्रखंड व ड्रायफ्रुट बुके देऊन निवृत्त एसीपी मंदार धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी मंचावर सुस्वर क्रिएशन्सच्या संचालिका सुकन्या जोशी, अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, सचिव हेमंत नेहते, डिंपल प्रकाशनाचे कौतुक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्रीधर फडके यांच्या सांगीतिक प्रवासाची माहिती उलगडणारी “अमृताच्या जणू ओंजळी” (दुसरी आवृत्ती, शब्दांकन सुकन्या जोशी) आणि “वंद्य वंदे मातरम्” (पाचवी आवृत्ती, लेखक डॉ. योगेश जोशी) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुजित जोशी, हेमंत नेहते, गीता जोशी, शलाका परदेशी, शेखर पदे, डॉ. संगीता गोडबोले, आरती कुलकर्णी, मच्छिंद्र कांबळे, कांतीलाल कडू, मानसी जोशी, अक्षता जोशी, ऐश्वर्या रिसबूड, ईशा कुलकर्णी, मंगेश घाटे, मंदार कुलकर्णी, रवींद्र कनोजे, अमोल धर्माधिकारी यांनी विशेष सहकार्य केले.
